ताज्या बातम्या
राजकीय
सामाजिक
कृषी
क्रीडा
मनोरंजन





मोबाईलला उपवास, बालपणाला श्वास!



दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा डिजिटल संयमाचा अनोखा संकल्प


चंदगड : श्रावण महिन्याचे औचित्य साधत पारंपरिक संस्कारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईलचा उपवास’ हा अभिनव आणि काळाची गरज ओळखणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनावश्यक मोबाईल वापर, गेम्स, रील्स आणि शॉर्ट व्हिडीओंपासून दूर राहण्याचा संकल्प केला.

भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध सणांच्या माध्यमातून संस्कार, संयम, शिस्त आणि चांगल्या सवयींची शिकवण दिली जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक जण उपवास करतात. मुले अनुकरणप्रिय असल्याने मोठ्यांच्या चांगल्या सवयींचे अनुकरण करतात. याच विचारातून ‘श्रावण महिना – मोबाईलमुक्त महिना’ करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्यात अनावश्यक मोबाईल वापर करणार नाही, गेम्स खेळणार नाही तसेच रील्स व अनावश्यक व्हिडीओ पाहण्यात वेळ वाया घालवणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली.

मोबाईलचा पूर्ण त्याग नव्हे, वापरावर संयम

मोबाईल हे शिक्षणासाठी उपयुक्त साधन असले तरी त्याचा अनावश्यक वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतो. गेम्स, रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सततचा स्क्रीन टाईम यामुळे अभ्यासाचा वेळ कमी होण्याबरोबरच झोप, एकाग्रता आणि डोळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘मोबाईलचा उपवास’ म्हणजे मोबाईलचा पूर्ण त्याग नव्हे, तर त्याच्या अनावश्यक वापरावर संयम ठेवण्याचा संकल्प असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

‘मोबाईल कमी, पुस्तक जास्त; स्क्रीन कमी, मैदान जास्त!’

विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता वाचन, मैदानी खेळ, कुटुंबीयांशी संवाद, छंद आणि सर्जनशील उपक्रम यांना अधिक वेळ द्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिस्त, वेळेचे नियोजन आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

श्रावणातील पारंपरिक ‘उपवास’ या संकल्पनेला आधुनिक जीवनशैलीशी जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वेगळा अनुभव ठरला. ‘या श्रावणात देवासाठी एक दिवस उपवास आणि स्वतःसाठी मोबाईलचा उपवास!’ या संदेशातून विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल कमी करून त्यांच्या हातात पुस्तक, खेळाचे साहित्य आणि सर्जनशीलतेची साधने देण्याचा सकारात्मक संदेश शाळेने दिला.

यावेळी प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख संजय साबळे, ज्येष्ठ अध्यापक जे. जी. पाटील, क्रीडा शिक्षक टी. व्ही. खंदाळे यांच्यासह अध्यापकवर्ग उपस्थित होता.

thumb
Chandgad
संपादक : महेश बस्सापूरे