ताज्या बातम्या
राजकीय
सामाजिक
कृषी
क्रीडा
मनोरंजन





स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर गीत, आकर्षक कवायत संचलनाने शिनोळी परिसर दुमदुमला




चंदगड : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिनोळी बु. येथे देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचे आकर्षक कवायत संचलन यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद परशराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक तसेच देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांना अभिवादन केले.

ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सूर्यवंशी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच काशिनाथ पाटील यांनी महात्मा गांधी, विठ्ठल कृष्णा बोकमूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, नितीन नारायण पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, शामराव चांभार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर पुंडलिक बाळू मेणसे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या रेखा शिवाजी तानगावडे, सुनीता शटुप्पा पाटील, विद्या प्रकाश गावडे, सुप्रिया शाम पाटील, सरिता रघुनाथ जाधव, डॉ. ऐश्वर्या बाबू पाटील तसेच पोलीस पाटील जत्ती मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, झेंडागीत तसेच महाराष्ट्र राज्यगीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कवायत संचलनाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. राष्ट्रभक्ती, शिस्त आणि देशसेवेचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे सचिव बी. डी. तुडयेकर, मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, तसेच रामकृष्ण सुतार, रघुनाथ गुडेकर, दौलत मेणसे, विनोद पाटील यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्या, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले. राष्ट्रभक्ती, सामाजिक एकोपा, शिस्त आणि देशसेवेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

thumb
Chandgad
संपादक : महेश बस्सापूरे